नरेश डोंगरे
नागपूर - बंगालच्या खाडीत उठलेल्या 'दाना' चक्रीवादळाने ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दाणादाण उडवली आहे. त्याची झळ विविध प्रांतातील प्रवाशांनाही बसली आहे. कारण देशभरातील विविध मार्गावर धावणाऱ्या एकूण ५५२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
१२० किलोमिटर पेक्षा जास्त प्रति तास वेग असलेल्या दानाचा केवळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच नव्हे तर विविध प्रांतावर प्रतिकुल परिणाम होणार आहे. कारण या चक्रीवादळाच्या भीतीमुळे साउथ ईस्ट रेल्वेने १५०, ईस्ट कोस्ट रेल्वेने १९८, ईस्टर्न रेल्वेने १९० तर साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने १४ गाड्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये नागपूर मार्गे रोज जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. अशात एकूण ५५२ गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे सर्वच मार्गावरील आणि बहुतांश प्रदेशातील प्रवाशांना त्याची झळ पोहचली आहे. नागपूर मार्गे हावडा, जगन्नाथ पुरी कडे धावणाऱ्या अनेक गाड्या उशिरा धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.