नागपूर : रेल्वेत घातपाताचे, हल्ला चढविण्याचे कारस्थान कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. नागपुरातील अजनी रेल्वे ग्राउंडवर सोमवारी आयोजित अखिल भारतीय अनुसूचित जाती-जमाती रेल्वे कर्मचारी संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एल. भैरव, महासचिव अशोक कुमार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यस्थापक नीनू इटेरिया, व्यवस्थापक मनीष अग्रवाल, व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.ते म्हणाले, भारतीय रेल्वेच्या विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्यासोबतच धोकाही वाढला आहे. ट्रॅकवर गॅस सिलिंडर किंवा तसेच काहीसे साहित्य ठेवून घातपात घडविण्याचे कारस्थान केले जात आहे. मात्र, घातपाताचा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी सतर्कतेने कर्तव्य बजावण्याची गरज आहे, असे यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरतीभारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने वार्षिक भरती कॅलेंडरची सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेतील भरती प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. पुढे बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले, गेल्या दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत करण्यात आलेल्या ४.४ लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे, असेही रेल्वेमंत्री म्हणाले.संविधानाचा सन्मान कर्तृत्वातून झळकायला हवाअधिवेशनाला संबोधित करण्यासाठी नागपुरात आलेले वैष्णव विमानतळावरून दीक्षाभूमीला पोहोचले. येथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला त्यांनी नमन केले. दरम्यान, संविधान दिनाच्या पूर्व संध्येला अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, संविधानाचा सन्मान केवळ प्रतीक म्हणून मर्यादित असू नये. संविधान वारंवार हातात झळकविण्यापेक्षा त्याचे प्रतिबिंब कर्तृत्वातून झळकायला हवे. मोदी सरकारचा संविधानाबाबतचा आदर अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत प्रवेश करताना संविधानासमोर नतमस्तक झाले होते, याचीही आठवण रेल्वे मंत्र्यांनी करून दिली.मोठ्या प्रमाणावर जनरल कोचची निर्मितीरेल्वेकडून १२ हजार जनरल कोचची निर्मिती केली जात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा प्रवास अधिक सहजसोपा होईल, असे सांगतानाच रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेतील सोयी, सुविधा आणि सुधारणांचाही उल्लेख केला. वैष्णव यांच्या हस्ते यावेळी कर्मचारी संघाच्या एका स्मरणिकेचेही विमोचन करण्यात आले. या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप मंगळवारी संविधानदिनी होणार आहे.
रेल्वेत घातपाताचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
By नरेश डोंगरे | Published: November 25, 2024 9:10 PM