नागपूर : मागील आठवडाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे अखेर गुरुवारी सकाळी विदर्भात दमदार आगमन झाले. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेसात वाजल्यापासून नागपुरात आलेला पाऊस नऊ वाजेपर्यंत सुरू होता. दुपारनंतर पुन्हा सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरातील अनेक खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने घरांमध्ये शिरले. यामुळे अनेक कुटुंबांची फजिती झाली. दिवसभारत ९९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नागपूर ग्रामीणमध्येही अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नदीनाले दुथडी भरून वाहिले. शेतातील अंकुरलेली आणि वाढीला लागलेली पिके पावसाअभावी सुकतात की काय अशी भीती असतानाच आलेल्या दमदार पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. उमरेड विभागात मुसळधार पाऊस पडला. रामटेक विभागात संततधार पावसाने शेतकरी समाधानी झाले. काटोल आणि नागपूर ग्रामीण विभागात मध्यम पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.
...
विदर्भातही दमदार पाऊस
विदर्भात गुरुवारी सर्वदूर पाऊस झाला. मागील २४ तासांत गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २३.३ मिलीमीटर पाऊस पडला. गोंदिया जिल्ह्यात ४१ मिलीमीटर तर वर्धा जिल्ह्यात २३ मिलीमीटर पावसाची नोंद गुरुवारी सकाळपर्यंत झाली होती. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत १०.५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.
...
सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. १० ते १२ जुलै या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा तसेच, घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवण्याचा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.