ठळक मुद्देनाल्या तुंबल्याने पाणी साचले : वाहतूक विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी उपराजधानीत दमदार एन्ट्री केली आहे. सकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. पावसाळी नाल्या तुंबल्याने शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र पावसामुळे तापमानात घट झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.जोराच्या पावसामुळे नागपूर शहरातील मिनीमातानगर, भरतनगर, सूर्यनगर, जुना भंडारा रोड, पारडी, सदर, कामठी रोड, माऊंट रोड, गड्डीगोदाम चौक, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स,जयस्तंभ रेल्वे स्टेशन, कॉटन मार्केट, पिवळी नदी, एकता कॉलनी, शांतीनगर, बोरगाव, जरीपटका, इंदोरा यासह शहाराच्या अन्य भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसतानाही शहरात ठिकठिकाणी नाल्या तुंबल्याने पाणी साचले होते. याचा विचार करता जोराचा पाऊ स झाल्यास शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पाणी तुंबल्याने रेल्वे स्टेशन रोड, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स समोरील मार्गावर पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. जुना भंडारा रोड, पारडी मार्गावरही वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे अनेकांची वाहने बंद पडली होती.जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊ स होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. दोन-तीन दिवस पाऊ स पडला. मात्र त्यानतंर पावसाने अचानक दांडी मारली होती. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली होती. पावसामुळे पेरणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भासह नागपुरात मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एक दोन दिवस असाच पाऊस उपराजधानीत पडणार असल्याचा अदांज आहे.नाल्या नसल्याने पाणी रस्त्यांवरउत्तर नागपुरातील पिवळी नदी भागातील अनेक वस्त्यात पावसाळी नाल्या व गडर लाईन नाही. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबते.संघर्षनगर, पवननगर, मेहबूबपुरा, वनदेवीनगर, येथे २० वर्षांपूर्वी गडर लाईन व पावसाळी नाली टाकण्यात आली होती. आता ती बुजली आहे. त्यामुळे पाऊस झाला की पाणी साचते. यामुळे नागरिकांना त्रास होतो.
हवामान खात्याचा अंदाज : २ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी आलेल्या पावसामुळे नागपूरकर सुखावले. पुढील ४८ तास जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २८ जून रोजी नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. साधारणत: २० ते २२ मिमी पाऊस दिवसभरात कोसळू शकतो. विदर्भात काही ठिकाणी गुरुवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर २९ व ३० जून रोजी पावसाचा जोर थोडा कमी होईल व १ जुलैपर्यंत शहरात ढगाळ वातावरणच असेल. २ ते ३ जुलै रोजी पावसाचा जोर परत वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.