नागपूर : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नागपुरात पावसाचा जाेर दुसऱ्या दिवशीही कायम हाेता. दुपारनंतर चांगल्याच सरी बरसल्या. ही रिपरिप रात्रीपर्यंत कायम हाेती. शहरात सकाळी ३३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. सायंकाळपर्यंत त्यात आणखी वाढ झाली.
अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारपासून जाेरदार हजेरी लावली. हा जाेर दुसऱ्या दिवशीही कायम हाेता. सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते, पण पावसाने उसंत घेतली हाेती. मात्र दुपारी २ वाजतानंतर पुन्हा एकदा धुंवाधार सुरुवात झाली. पुढचे काही तास थांबून थांबून चांगल्याच जलधारा काेसळल्या. हलक्या पावसाची रिपरिप रात्रीपर्यंत कायम हाेती व उसंत घेत जाेराच्या सरीही बरसत राहिल्या. दरम्यान, दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बहुतेक रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागला. सखल वस्त्यांमध्येही पाणी साचल्याची माहिती आहे. दरम्यान, तापमानात ०.५ अंशाची वाढ हाेत ३० अंश तापमान नाेंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा हा मुक्काम पुढचा आठवडाभर तरी राहणार आहे. १९ ते २२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा विभागाने दिला आहे. जिल्ह्यातही बहुतेक भागात चांगला पाऊस हाेण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीसाठी पावसाची कमतरता भरून निघेल. मात्र शेतात साचलेल्या अधिकच्या पाण्याचा निचरा करण्याची सूचना विभागाने दिली आहे.