लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील २४ तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारच्या रात्री आणि बुधवारी सकाळी जिल्ह्यात पाऊस आला. मंगळवारी रात्री नरखेड तालुक्यातील थडीपवनी परिसरात सौम्य गारपीट झाले. बहुतांश भागात संत्रा गळाला तर वाऱ्यामुळे गहु झोपला. पुढचे दोन दिवस विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. नरखेड तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. जलालखेडा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. चना, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, चना, भाजीपाला, संत्रा, मोसंबी पिकाला मोठा फटका बसला. नरखेड तालुक्यातील, अंबाडा, मेंढला, जलालखेडा, थंडीपवनी भारसिंगी, खापा, खैरगाव शिवारात जोरदार पाऊस झाला.
सावनेर तालुक्यातही बडेगाव शिवारात चांगलाच पाऊस झाला. नरखेड तालुक्यातील मोवाड परिसरात रात्री १२ वाजतानंतर पाऊस आला. पिपळा केवलराम, सावरगाव या परिसरातही जोदार पाऊस झाला. रामटेकमध्येही संततधार पाऊस झाला. पारशिवणी तालुक्यात बुधवारी सकाळी पाऊस पडला. नागपूर शहरातही सकाळी काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. थंडीपवनी शिवाराच्या परिसरात १६ फेब्रुवारीला रात्री २ वाजताच्या दरम्यान हलका पाऊस आला. सोबत सौम्य बारीक गाराही पडल्या. त्यामुळे संत्रा मोठ्या प्रमाणात गळाला. चना, गहू, तुरी, कपाशीचेही मोठे नुकसान झाले.
...
सर्वेक्षणाची मागणी
शासनाने तातडीने पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. पावसामुळे संत्रा, मोसंबी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस सतत सुरू राहिला तर पिकांचे १०० टक्के नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
...
पुढचे दोन दिवस पावसाचे
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढचे दोन दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचे असल्याच्या इशारा देण्यात आला आहे. १७ तारखेला नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, १८ तारखेला वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
नागपुरात १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
गेल्या २४ तासांमध्ये नागपुरात १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी आर्द्रता ८४ टक्के होती, तर सायंकाळी ६० टक्के दर्शविण्यात आली. दिवसा हवेत गारवा होता. सायंकाळच्या वातावरणात मात्र थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही.