लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकाशात काही प्रमाणात ढगांनी गर्दी केल्यामुळे नागपूरसहविदर्भातील काही जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. मराठवाड्यापासून ते केरळपर्यंत तयार झालेल्या चक्रीवातामुळे वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने २० ते २२ मार्चदरम्यान विदर्भासाठी ऑरेंज व येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २० मार्च रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. २१ मार्च रोजी भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात हवेची गती वाढून ४० ते ५० किमी प्रति तास होईल. विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस येईल. २२ मार्च रोजी गोंदिया व वाशिम जिल्ह्यात हवेचा वेग प्रति तास ४० ते ५० किमी असेल.
पारा ४० अंशाखाली
- गेल्या काही दिवसांत नागपूरचा पारा ४० अंशांखाली स्थिरावला आहे. बुधवारी नागपूरचे दिवसाचे तापमान ३९.२ अंश से. नोंदविले गेले.
- आकाशात काही प्रमाणात ढग असल्यामुळे तापमानात घट झाली आहे. असे असले तरी नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत.
- ४१.१ अंशासह अकोला सर्वांत 3 गरम राहिला. ब्रह्मपुरी ४०.३, अमरावती-वर्धा ४०.२ व चंद्रपूरमध्ये ४० अंश तापमानाची नोंद झाली.
- विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ४ पारा ३९.९ ते ३७ अंशांदरम्यान राहिला. गोंदियात दिवसाचे तापमान ३७ अंश राहिले. येथे विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.