नागपूर : हाेळी आणि धूलिवंदनाच्या पर्वावर विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यांना मंगळवारी रात्री वादळी वाऱ्याने झोडपले. ढगांचा आवाज व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसानेही हजेरी लावली. पावसाळी वातावरणामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठी घसरण झाली. पावसामुळे पारा घसरला व गारठा वाढल्याने निघून गेलेली थंडी परतल्यासारखी जाणीव हाेत आहे.
पश्चिमेकडून आलेल्या पश्चिम झंझावाताच्या प्रभावाने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात साेमवारपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ढगांची उघडझाप हाेत असताना उन्हाचेही चटके बसत हाेते. मंगळवारी सकाळपासून दिवसभर ढगांचा खेळ सुरू हाेता. सायंकाळी वातावरण पूर्ण बदलले. सुसाट वाऱ्यासह वादळ सुरू झाले. थांबून थांबून पावसाचे थेंब पडत हाेते. रात्री उशिरापर्यंत वीज गर्जनेसह पावसाचा खेळ सुरू हाेता. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या पाऱ्यात प्रचंड घसरण नाेंदविण्यात आली. काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची नाेंद झाली.
अमरावतीत २४ तासांत सर्वाधिक ११.४ अंशांची घसरण झाली व येथे २४.८ अंश कमाल तापमान नाेंदविण्यात आले. अकाेल्यातही दिवसाचा पारा तब्बल १०.५ अंशाने घसरला व २५.२ अंशांची नाेंद झाली. दाेन्ही जिल्ह्यांत रात्रीचा पाराही घसरला. सरासरीपेक्षा ६.१ व ६.३ अंशांची घसरण हाेऊन १३.४ व १३.५ अंश तापमानाची नाेंद झाली. यामुळे हिवाळ्यासारखे वातावरण तयार झाले आहे. नागपुरात कमाल तापमान चार अंशांनी घसरले व ३१ अंशांची नाेंद झाली तर रात्रीचा पारा ४.१ अंशांनी घसरत १४.९ अंशांवर आला. वर्ध्यामध्ये दिवसाचे तापमान ८ अंश व रात्रीचा पारा ५.२ अंशाने घसरला. वाशिममध्ये दिवसाचा पारा तब्बल १२ अंशांनी खाली घसरला. चंद्रपूर, ब्रम्हपुरीमध्ये कमाल तापमानात पाच अंशाची, तर गाेंदियात तीन अंशाची घसरण झाली. पुढचे काही दिवस आकाशात ढगांची उपस्थिती राहणार असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचीही शक्यता आहे.