अभय लांजेवार
नागपूर : मृग नक्षत्र कोरडा गेला. हवामान खात्याचा अंदाजसुद्धा चुकला. दुसरीकडे अद्यापही पाऊस लपाछपीचा खेळच खेळतोय. कधी कडाक्याची ऊन, कधी काळ्याकुट्ट आभाळाची छाया तर मध्येच १०-१५ मिनिटांच्या पावसाच्या सरी. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.
बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी पेचात अडकले आहेत. पेरणी केली आणि पावसाने वाकोल्या दाखविल्या तर मग कसे होणार, महागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी? असा सवाल शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
उमरेड तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ४५,५०० हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये सर्वाधिक कपाशी २१,४०० हेक्टर क्षेत्रात तर सोयाबीनचे क्षेत्र १६,९०० हेक्टर आहे. अन्य पिकांमध्ये भात, तूर आदी पिकांचा समावेश आहे. पेरणीबाबतचा अंदाज घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांच्याशी चर्चा केली असता, सध्या तालुक्यात ५० टक्के कपाशीची लागवड झाली असून, ३० टक्क्यांच्या आसपास शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उरकविली असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही त्या म्हणाल्या. कपाशी लागवडीसाठी फारशी अडचण उद्भवत नसली तरी पावसाने अचानकपणे दांडी मारल्यास सोयाबीन पेरणीवर त्याचा प्रभाव नक्कीच पडणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे दिवसागणिक सोयाबीनची पेरणी लांबल्यास उत्पादनावरसुद्धा फटका बसणार आहे. दुसरीकडे पेरणी झाली आणि पावसाने दडी मारली तरीसुद्धा नुकसानीला सामोरे जावे लागेल. या हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी दुहेरी चक्रव्यूहात सापडले आहेत.
पाऊस कमीच !
उमरेड तालुक्यात एकूण सात सर्कल आहेत. यामध्ये २३ जूनपर्यंत उमरेड सर्कलमध्ये ८२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हेवती सर्कल (६९.६ मिलिमीटर), पाचगाव (५१.२), मकरधोकडा (४६.९), सिर्सी (४६.४) आणि सर्वात कमी बेला सर्कलला केवळ २६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डव्हा सर्कलमध्ये पर्जन्यमापक यंत्राची सुविधा नाही. यामुळे या परिसरात किती पाऊस झाला, याची नोंद होत नाही. पर्जन्यमापक यंत्र प्रस्तावित असल्याची माहिती आहे. तालुक्यात साधारणत: १८ जूनपासून (२१.९६ मिलिमीटर) पाऊस सुरू झाल्याचे दिसून येते. तालुक्याची सरासरी काढली असता २३ जूनपर्यंत केवळ ५४.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
मागील वर्षीचा पाऊस
मागील हंगामात ११ जूनपासून पावसाचा जोर सुरू झाला. सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली. यामुळे सोयाबीनची पेरणी आणि कापसाची लागवड सुनियोजित झाली. मागीलवर्षी २३ जूनपर्यंत १९९.३५ मिलिमीटर असा समाधानकारक पाऊस झाला होता.