नागपूर : दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पाऊस दमदार नसला तरी ढगाळलेल्या वातावरणामुळे तापमान खालावले. वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी थंडावा पसरवला.
नागपुरातील शनिवारचे दिवसभरातील तापमान ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळी वातावरणात शीतलता होती. सकाळी आर्द्रता ६२ टक्के नोंदविण्यात आली, तर सायंकाळी ६० टक्के नोंद झाली. नागपुरातील पश्चिम भागात दुपारनंतर वादळासह पावसाने हजेरी लावली. दुपारीपर्यंत कडक ऊन असले तरी दुपारनंतर मात्र वातावरणात थंडावा पसरला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांनी याचा आनंद घेतला. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस असे वातावरण राहणार आहे.
विदर्भातही दुपारनंतर काही ठिकाणी वादळासह पावसाने हजेरी लावली. गडचिरोली, अमरावती, गोंदिया जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी रात्री पाऊस पडल्याने वातावरण थंडावले. गडचिरोली आणि गोंदियातील तापमान सर्वात कमी म्हणजे ३८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. बुलढाणा आणि चंद्रपुरात ३९.६ पारा अंशावर होता. वाशिममध्ये ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. अमरावती ४०.४, तर वर्धा येथे ४०.५ अशी नोंद घेण्यात आली. यवतमाळ ४१ अंशांवर तर अकोलात सर्वाधिक म्हणजे ४२ अंशावर पारा होता.