नागपूर : विदर्भातील पावसाचा मुक्काम पुन्हा दोन दिवसांनी वाढला आहे. हवामान विभागाने यापूर्वी १२ तारखेपर्यंत अंदाज वर्तविला होता. आता १४ जानेवारीपर्यंत विदर्भातील पाऊस लांबणार असल्याचा अंदाज आहे.
मागील २४ तासात २८.८ मिमी पावसाची नोंद झाली. नागपुरात बुधवारी दिवसभरात पाऊस आला नसला तरी वातावरण ढगाळलेले होते. सकाळी सूर्यदर्शन बरेच उशिराने झाले. दुपारीही असेच वातावरण असल्याने थंडी वाढली होती. सकाळी आर्द्रता ९९ टक्के, तर सायंकाळी ७७ टक्के नोंदविली गेली. मागील २४ तासांतील तापमानाचा पारा घसरून १५.६ अंश सेल्सिअसवर आला. सायंकाळी शेकोट्या पेटवून ऊब घेत असलेले नागरिक काही ठिकाणी पाहावयास मिळाले.
दरम्यान, हवामान विभागाने वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम येथे १४ जानेवारीपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असून यलो अलर्ट दिला आहे. पूर्व विदर्भात पावसाचा इशारा नसला तरी थंडी वाढणार असल्याचे संकेत आहेत.