नागपूर : काेकण, गाेव्यासह विदर्भातही या आठवड्यात पावसाने चांगला मुक्काम ठाेकला आहे. दाेन-तीन दिवसांपासून सुरू असलेला जाेर गुरुवारीही कायम हाेता. सकाळपर्यंत अमरावतीमध्ये सर्वाधिक ७९.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूरलाही पावसाने सुखावले. सकाळपर्यंत ७३ मिमी तर गुरुवारी सायंकाळपर्यंत ३६.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाची रिमझिम अशीच कायम राहणार आहे. १० ते १२ सप्टेंबरला बहुतेक सर्वच जिल्ह्यांत पावसाळी वातावरण राहील. काही जिल्ह्यांतील काही ठिकाणी जाेरदार पाऊस हाेईल तर काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेईल. त्यानंतर १३ व १४ सप्टेंबरला बहुधा सर्वत्र मुसळधार पाऊस हाेण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. विभागाने त्या दिवसांसाठी यलाे अलर्ट जारी केला असून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व काही दिवस कायम राहणार असल्याने पावसाची शक्यता बनली आहे.
दरम्यान, गुरुवारी विदर्भातील गाेंदिया, गडचिराेली व चंद्रपूर जिल्हा काेरडा राहिला. इतर जिल्ह्यांना मात्र पावसाने भिजविले. नागपुरात थांबून थांबून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काटाेल, नरखेडला जाेरदार पावसाने झाेडपले. इतर तालुक्यांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अमरावतीमध्ये पावसाची संततधार कायम हाेती. अकाेल्यातही २१.५ मिमी नाेंदीसह चांगला पाऊस झाला. याशिवाय बुलडाणा २६ मिमी, भंडारा १५.२ मिमी, वाशिम १० मिमी तर वर्ध्यात चांगल्या पावसाची नाेंद झाली. आकाशात ढगांची गर्दी कायम असून पुढचे पाच दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात कमी पावसाने सर्वांची चिंता वाढविली आहे. गाेंदिया व गडचिराेलीत हा तुटवडा अनुक्रमे उणे २५ व उणे २४ वर गेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसावर भिस्त टिकून आहे.