नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राेज पावसाची हजेरी लागत आहे. कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी सायंकाळी पावसाचे आगमन हाेत आहे. गुरुवारी (दि, २३) धाे-धाे धुतल्यानंतर शुक्रवारीही पावसाने नागपूरकरांना झाेडपले. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान पावसाने जाेरदार हजेरी लावत तास-दीड तास माेठ्या जलधारांनी दाणादाण उडविली.
वातावरणात ऊनसावल्यांचा खेळ चालला आहे. गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही सकाळपासून ऊन पडले हाेते. दुपार हाेता-हाेता ढगांची गर्दी जमली आणि जाेराच्या सरी सुरू झाल्या. मात्र गमतीदार खेळ चालला हाेता. काही भागांत ऊन पडले असताना दुसरीकडे पावसाने घेरले. सीताबर्डी उड्डाणपुलावरून झिराे माॅईल भागात ऊन पडले असताना राहाटे काॅलनी चाैकात जाेराचा पाऊस सुरू हाेता. त्यामुळे काेरड्या भागाकडून येणाऱ्या वाहनचालकांची पावसाकडे जाताना तारांबळ उडत हाेती. अचानक पावसाचा सामना करणारे अनेकजण पुलावरच रेनकाेट घालण्यासाठी धावपळ करीत हाेते. काही वेळानंतर ऊन पडलेल्या भागाकडे पावसाच्या सरी सुरू हाेत हाेत्या. दरम्यान, गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही जाेराच्या पावसाने सखल भागात पाणी साचले हाेते. अनेक भागांत रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खाेळंबा झाला हाेता. दरम्यान, उन्हानंतर थाेडा वेळ पाऊस पडत असल्याने दमटपणा वाढला असून नागरिकांना तो त्रासदायक ठरत आहे. पुढचे दाेन दिवस असेच वातावरण राहणार असून, साेमवारी (दि. २७) जाेरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.