लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.पुराचे पाणी सखल भागासह गावांमध्ये शिरल्याने एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉण्ड फोर्स), एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉण्ड फंड) आणि सैन्याच्या जवानांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा,कामठी, पारशिवनी आणि कुही या चार तालुक्यांमधील या दोन्ही नदीकाठच्या ४८ गावांमधील ४५४७ कुटुंबातील २६,४९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या पुरात हजारो लोक पाण्यात अडकले आहेत.इकडे रविवारी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे.
पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरने फूड पॅकेट्स पुरविलेपूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासनातर्फे मदत कार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, एनएमसी, तसेच स्थानिक शोध बचाव पथक यांची सेवा घेण्यात आली आहे. यांच्या मदतीने आतापर्यंत चार तालुक्यातील २६,४९० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदत कार्य अजूनही सुरूच आहे. रविवारी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप या गावाात ७५० फूड पॅकेट व पाण्याची बॉटल हेलिकॉप्टरमधून जवळपास २५० पूरग्रस्तांना पुरवण्यात आली. कुही तालुक्यात एनडीआरएफ, व एसडीआरएफच्या पथकासह आर्मीचेही पथक तैनात आहेत.
एनडीआरएफच्या टीम दाखलबचावकार्याला वेग देण्यासाठी पुणे येथून एनडीआरएफच्या चार टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या पथकांनी टेकेपार येथे एनडीआरएफ तर चिचघाट, चिकना, सोनेगाव येथे एसडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य केले. चिचघाट येथे सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.