लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : मागील दोन आठवड्यापासून रिमझिम, मुसळधार पावसाच्या सरींनी चांगलेच सतावले आहे. अशातच सोमवारी (दि.२०) मध्यरात्रीपासून पुन्हा परिसरात पावसाचे थैमान बघावयास मिळाले. मंगळवारी अगदी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. कापणीला आलेल्या सोयाबीनला अतिपावसामुळे चांगलाच फटका बसला असून, अद्याप सर्वेक्षणाबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उमरेड विभागात सोयाबीन, कपाशी हे मुख्य पीक मानले जाते. सोयाबीन कापणीच्या अवस्थेत असून, कपाशी बोंडअवस्थेत दिसून येत आहे. अशावेळी संततधार पावसाच्या तडाख्यात पिके काळवंडली आहेत. सोयाबीनमधील दाणा परिपक्व होण्याच्या मार्गावर असतानाच पावसामुळे खेळखंडोबा झाला. हवामान बदलामुळे अनेक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आधीच कोरोनाची दोन वर्षे शेतकऱ्यांना आर्थिक खड्ड्यात टाकणारे ठरले. दुसरीकडे यंदाचा हंगाम सुरुवातीला अत्यंत पोषक असतानाच दोन आठवड्यापासून पावसामुळे सोयाबीनवर कापणीचे संकट उभे ठाकले आहे. कपाशीवरसुद्धा विविध रोंगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, पावसामुळे फवारणीची कामे थांबली आहेत. यामुळे कपाशीलाही चांगलाच फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोयाबीनचे उभे पीक काळे पडत असून शेंगांना कोंब फुटत असल्याचे गंभीर चित्रसुद्धा अनेकांच्या शेतात सुरू झाले आहे. सततच्या पावसामुळे उत्पादनास चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत असून, असंख्य शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणी आणि काढणीसुद्धा परवडणारी नाही, अशा वेदना व्यक्त होत आहे. पावसाने हाल-बेहाल केले असून लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधावे, अशी मागणी केली जात आहे. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.