नागपूर : अचानक पावसाच्या गायब हाेण्याने चिंताग्रस्त झालेल्यांसाठी काहीसा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या तीन-चार दिवसात पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस हाेण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. पश्चिम विदर्भासाठी मात्र निराशादायक चित्र असेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली, वर्धा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस काही ठिकाणी विजांचा कडकडाट व हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर २९ ऑगस्टपासून सर्वत्र जाेरदार पाऊस हाेईल. विभागाने यादरम्यान येलाे अलर्टचा इशारा दिला आहे. वर्धा, नागपुरात बहुतेक ठिकाणी तर भंडारा, गाेंदिया, गडचिराेलीत सर्वच ठिकाणी पावसाच्या सरी येतील. उल्लेखनीय म्हणजे दहा-बारा दिवस दडी मारल्यानंतर मागील आठवड्यात १६ ते १८ ऑगस्टदरम्यान पावसाने जाेरदार धडक दिली. त्यानंतर मात्र पुन्हा ताे गायब झाला. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त झाला हाेता. मात्र अपेक्षेप्रमाणे ताे पडलाच नाही. त्यामुळे विदर्भातील जलाशय, धरणे अद्यापही क्षमतेप्रमाणे भरली नाही. धक्कादायक म्हणजे कामठी खैरी व ताेतलाडाेह धरणात अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा न झाल्याने नागपूर शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातही तीच परिस्थिती असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज दिलासादायकच म्हणावा लागेल. अमरावती, अकाेला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. हवामान खात्याने या विभागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे वर्तविले आहे. दरम्यान, गुरुवारी चंद्रपुरात एका ठिकाणी पाऊस पडला; पण इतर सर्व जिल्हे काेरडेच राहिले. पाऊस गायब झाल्याने तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. नागपूरचे तापमान ३३.८ अंश नाेंदविण्यात आले. सर्वाधिक ३४ अंश तापमान चंद्रपूरचे हाेते.