लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पुढचे चार दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाजही विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, परिस्थितीनुसार नागपूरसह सर्व जिल्ह्यांत २४ तासाच्या तापमानात ३ ते ५ अंशाची घट नाेंदविण्यात आली असून, पुढचे चार दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. आकाशात ढग दाटल्यामुळे तापमान घटल्याने सकाळपासूनच अल्हाददायक वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण मध्य प्रदेश व शेजारच्या क्षेत्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने विदर्भासह आसपासच्या भागात वातावरणात बदल झाला आहे. गुरुवारी नागपुरात ४१ अंश तापमानासह दिवसभर उन्हाचे चटके आणि उष्णताही जाणवली. सायंकाळी मात्र वातावरणाने कूस बदलली. आज सकाळपासूनच आकाशात ढग दाटलेले हाेते. नागपूर जिल्ह्यासह इतर काही माेजक्या ठिकाणी तुरळक पावसाची नाेंद झाली. हे वातावरण आणखी चार दिवस राहाणार आहे. उत्तर-पूर्व दिशेने वाहणारे वेगवान वारे विदर्भ हाेत दक्षिणेकडे जात असल्याने हा बदल दिसून येत आहे. मात्र १०, ११ व १२ एप्रिलपर्यंत बहुतेक जिल्ह्यात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वेगाने वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यात सतर्क राहण्याचा तर नागपूरसह इतर जिल्ह्यात लक्ष देण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
तापमान घटल्याने दिलासा
दरम्यान, गेल्या २४ तासांत नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानात घसरण झाली आहे. नागपूरमध्ये ३.१ अंशाच्या घसरणीसह ३८.२ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. ४१.२ अंशासह अकाेला सर्वाधिक उष्ण व त्याखालाेखाल ४०.२ अंश चंद्रपूरचे तापमान हाेते. ३४.२ अंश तापमानासह सर्वाधिक ५.८ अंश घसरण गाेंदियामध्ये व त्याखाली ५.२ अंशाची घट हाेत गडचिराेलीत ३६ अंशाची नाेंद करण्यात आली. वर्धा, वाशिममध्येही ३ पेक्षा जास्त अंशाची घट झाली तर अमरावती व बुलढाण्यात काही अंशाची घसरण झाली.