लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने येत्या गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. १७ मार्चला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर १८ तारखेला विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
नागपूरसह वर्धा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात १७ मार्चला तुरळक पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सर्वच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने झालेले नुकसान तसेच असताना आता पुन्हा शेतकऱ्यांंना पावसाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, रविवारी नागपूरसह सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तापमानात हा बदल झाला असून रात्रीचेही तापमान कमी झाले आहे. नागपुरातील तापमान ३.५ अंशाने घटल्याने ३३.७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. अमरावतीमध्येही ३३.८ अंश सेल्सिअस तापमान होते. वर्धा आणि बुलडाणामध्ये ३४.४ व ३३.१ अंश सेल्सिअस नोंद झाली. यवतमाळात ३५.७ तर वाशिममध्ये ३७ अंश तापमान नोंदविले गेले. गोंदियात ३६ तर अकोला व गडचिरोलीमध्ये ३६.१ आणि ३६.४ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे.
चंद्रपूर चाळिशीजवळ
चंद्रपूरचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी येथील तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यात ०.४ अंशाची भर पडली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पारा चाळिशीजवळ पोहचायला लागला आहे. या शहराभोवती असलेल्या कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र आणि एमईएल प्रकल्प यामुळे येथील तापमानाची तीव्रता अधिक आहे.
...