नागपूर : विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाबद्दल हवामान विभागाने दिलेला अंदाज कायम आहे. नव्या सूचनापत्रानुसार, येत्या १८ एप्रिलपर्यंत पाऊस वर्तविला आहे. तर १५ एप्रिलला सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एक-दोन ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जोमाचा नसला तरी मेघगर्जना आणि विजांचा इशारा देण्यात आल्याने खबरदारी घेण्याची आवश्यक्ता आहे.
दरम्यान, नागपुरात बुधवारी सायंकाळी काही प्रमाणात वादळ आले. मात्र कुठेच नुकसान झाल्याची माहिती नाही. दोन दिवसांपासून वातावरणही ढगाळलेले आहे. यामुळे तापमानात बराच बदल झाला आहे. बुधवारी दिवसभराचे तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कालच्या पेक्षा यात ०.८ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. गडचिरोलीमधील तापमान विदर्भात सर्वांत कमी म्हणजे ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर, अकोलामधील तापमान सर्वांत अधिक म्हणजे ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.