नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली; परंतु विजांनी मात्र बळी घेतले. विजा काेसळल्याने सावनेर तालुक्यातील हेटी (सुरला) शिवारात झाडाच्या आडाेशाला उभा असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर धामना परिसरात पाच शेळ्या हाेरपळल्या. या घटनेत एक गुराखी गंभीर जखमी झाला आहे.
सावनेर तालुक्यातील पहेलेपार येथील रहिवासी वासुदेव रेवाराम खंगारे (४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची हेटी शिवारात शेती आहे. गुरुवारी कपाशीला खत देण्यासाठी शेतावर गेले हाेते. जाेरात पाऊस सुरू झाल्याने महिलांनी शेतातील झाेपडीत आश्रय घेतला, तर वासुदेव शेतातील आंब्याच्या झाडाखाली उभे राहिले. त्यात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जाेरात कडाडलेली वीज थेट झाडावर काेसळली व त्यातच हाेरपळून त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत नागपूर ग्रामीणच्या धामना हद्दीतील शिमका शिवारात जाेरात कडाडलेली वीज थेट झाडावर काेसळल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या पाच बकऱ्यांचा हाेरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी उभा असलेल्या प्रकाश पुंडलिक थोटे नामक मंगरूळ निवासी गुराखी गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच हेडकाॅन्स्टेबल अरविंद नाईक व संदीप येेवले यांनी जखमी प्रकाशला रुग्णालयात नेले.
कुटुंबीयांवर संकट
वासुदेव खंगारे हे घरातील कर्ता पुरुष हाेते. त्यांच्याकडे उपजीविकेचे शेतीशिवाय दुसरे काेणतेही साधन नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. त्यांना वृद्ध आई वडिलांसाेबत १३ वर्षांची मुलगी, अडीच वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर संकट काेसळले आहे.
नागपुरात ३० मि.मी.
हवामान विभागाने तीन दिवस पावसाच्या अंदाजासह विजांच्या कडकडाटाचा यलाे अलर्ट दिला आहे. गुरुवारी नागपूर शहरात दिवसभरात ३० मि.मी. पावसाची नाेंद झाली. रात्रीही पावसाची रिपरिप सुरूच हाेती. जिल्ह्यातील सावनेर, काटाेल, रामटेक व इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. रामटेक तालुक्यात दाेन दिवसांत ४२ मिमी पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे धान, कापूस व तूर पिकाला संजीवनी मिळाली आहे. काटाेल क्षेत्रात सकाळपर्यंत ३२ मि.मी. पाऊस झाला आहे. वेधशाळेने पुढचे दाेन दिवस जाेरदार पावसाचा अंदाज वर्तविला असून, विजांच्या कडकडाटाचा यलाे अलर्टही दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.