लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. खरेदीसाठी बाजारपेठा खचाखच भरल्या असताना, शनिवारी मुसळधार पावसाने नागपूरकरांच्या खरेदीत विघ्न आणले. दुपारपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला. अनेकांनी शनिवारी खरेदीचा बेत आखला होता. मात्र पाऊस असा काही बरसला की अनेकांच्या मूडच निघून गेला.दिवाळीत रोषणाईसाठी घरोघरी आकाशकंदिल बांधण्यात येणार होते, दीपमाळांनी घर उजळणार होते. मात्र पावसाने विचका केला. बाजारात फुलांची दुकाने सजली होती. दिवाळीच्या साहित्याची दुकाने थाटली होती. पण पाऊस आला आणि सर्वत्र धावपळ झाली. पावसामुळे बाजारातील गर्दी कमी झाली. मुख्य बाजारपेठेमध्ये असलेली रेलचेल अचानक मंदावली. या पावसाने दिवाळीच्या खरेदीत खोडाच टाकला नाही, तर शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढविली. शेतातील पीक कापणीला आले असताना, पाऊस नुकसान करून गेला. अकाली आलेल्या पावसामुळे व्यापारी वर्गही निराश झाला.
नागपुरात दिवाळीच्या खरेदीत पावसाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:45 AM