नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवार-गुरुवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. भिवापूर वगळता सर्वच तालुक्यावर पाऊस बरसला. मात्र काेटाेल आणि नरखेड तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला. मुसळधार पावसामुळे जाम आणि काेलार नदीला पूर आला. दाेन्ही तालुक्यातील तलाव फुटल्याची माहिती आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले व शेतीला अताेनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात बुधवारपासूनच पावसाने जाेर धरला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत ७३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, तर सायंकाळपर्यंत ३६.४ मिमी पाऊस झाला. ही नाेंद सर्वदूर असल्याचे दिसते. काटाेलमध्ये पावसाने धाेक्याचा स्तर पार केला. येथे ११९.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. त्याखालाेखाल नरखेडमध्ये ७०.८ मिमी पाऊस नाेंदविला गेला. तालुक्यात जलालखेड्याजवळ जाम नदीला पूर आल्याने येथील पुलावरील वाहतूक आठ तास बंद हाेती. पूर ओसरल्यावर पाेलिसांनी दाेन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली. काही गावामध्ये पुराचे पाणी शिरले. पाझर तलावही फुटल्याची माहिती आहे. त्यामुळे १२५ पेक्षा अधिक हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. संत्रा, माेसंबी, कापूस, तूर आदी पिके खराब झाली.
दुसरीकडे काटाेल तालुक्यातही मुसळधार पावसाचा कहर झाला. नदी-नाले ओसंडून वाहत हाेते. नदीला पूर आल्याने काटाेल-सावरगाव वाहतूक रात्री बंद करण्यात आली. नदीलगतच्या गावामध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. रात्री पाण्याच्या वेढ्यात सापडलेल्या ५० च्यावर कुटुंबांना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितस्थळी हलविले. विविध पिकांना माेठे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, इतर तालुक्यांनाही दाेन दिवस मुसळधार पावसाने झाेडपले.
तालुका पाऊस (मिमी)
कळमेश्वर ४२.४
सावनेर ३८.२
हिंगणा ३३.३
रामटेक २७
माैदा २७.७
कामठी २४
पारशिवनी १८
कुही १५.३
उमरेड ९.२