रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाने शेतकरी सुखावले असले तरी तालुक्यातील धरणातील साठा मात्र अद्यापही अल्पच आहे. त्यामुळे भविष्यात रबी हंगामातील सिंचनासाठी तालुक्यात आणखी पावसाची आवश्यकता आहे.
तालुक्यात गत दोन दिवसात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तलावातील पाणीसाठा कमी आहे. तोतलाडोह धरण मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहे. साध्या चौरई धरणात केवळ ५० टक्के (२१२ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी येथे ७८ टक्के जलसाठा होता. चौरई धरण भरले तर ओव्हरफ्लोचे पाणी तोतलाडोहमध्ये येईल आणि पाण्याची पातळी वाढेल. बुधवारपर्यंत रामटेक खिंडसी तलावात ३६.६८ टक्के (३७ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ३२.४८ टक्के होते. नवेगाव खैरी तलावात ४१ टक्के (५९ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ९६ टक्के होते. तोतलाडोह तलावात ६२.९३ टक्के (६४० दलघमी)
पाणी साठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ९३.३८ टक्के होते. मधल्या काळात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र गत २० दिवस पाऊस पडला नाही.
पेंचच्या डाव्या कालव्यातून २,६०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून ७० क्युसेक पाणी भात लावणी आणि सिंचनासाठी सोडण्यात येत होते. पाऊस आल्याने पेंच जलाशयाचे पाणी बंद करण्यात आले. तोतलाडोह, खिंडसी आणि नवेगाव खैरी धरणात यंदा पाणीसाठी अत्यल्प आहे. गत वर्षीचा जलसाठा असल्यानेच भंडारा व नागपूर जिल्हातील पेंच धरणावर अवलंबून असलेली ७० हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी झाली. त्यासाठी १२ जुलै ते १७ ऑगस्ट पर्यंत पाणी सोडल्या गेले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाला तरच पाणीसाठा वाढेल असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू बोम्बले यांनी सांगितले.