कोटाल : काटोल तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. रात्री ७ नंतर बरसलेल्या पावसाने काही तासातच नदी-नाल्यांना पूर आला. नदी पात्रालगत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास ५० कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले. ग्रामीण भागातही पिकांचे नुकसान झाले.
पावसाळा संपत आला असल्याने तालुक्यातील जलाशयातील पाणी साठा अत्यल्प असल्याने नवीन वर्षात पाण्याची समस्या निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात होती. यातच अधून मधून येणारा पाऊस शेतमालाला संजीवनी देत असल्याचे चित्र होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसाने गत १५ दिवसाचा बॅकलॉग भरून काढला. तालुक्यातील जाम नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावरून गेल्याने काटोल-सावरगाव मार्गावरील वाहतूक रात्री बंद करण्यात आली होती. शहरातील हत्तीखाना, अन्नपूर्णा नगर, संगमनगर परिसरातील नदीलगत भागातील घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. नदीपात्रापासून दोन्ही बाजूस पाणी असल्याने रात्री येथील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. गुरुवारी सकाळी नदीच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर साचलेला गाळ साफ करण्यात आला. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलावरील डांबरी रस्ता उखडला.
या गावांना बसला फटका
बुधवारी सहा तासात तालुक्यात ६८.७३ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वात जास्त १०७ मि.मी. पाऊस पारडसिंगा सर्कलमध्ये झाला. तालुक्यातील ढवळापूर, हातला, कुकडीपांजरा, पारडी, लिंगा, बोरगोंदी, पानवाडी, हरणखुरी या गावातील शेतामध्ये पाण्याचे तळे साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही गावात विहिरी खचल्याची माहिती आहे. तालुक्यात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
दोन तास राजकुमारची झुंज
पारडी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना शिवारातील शेतातून राजकुमार केशवराव शेंडे (४२) हा पूल ओलांडून पारडी येथील घरी जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. मात्र, एका तारेच्या मदतीने तो बचावला. दोन तास आरडाओरड करून मदत मागत लिंगा येथील सरपंच विनोद ठाकरे, मुकेश पाटील आदींनी त्याला पाण्याबाहेर काढले.
090921\img-20210909-wa0094.jpg~090921\img-20210909-wa0193.jpg~090921\img-20210908-wa0178.jpg
पारडसिंगा सर्कल मधील ढवळापूर शेतशिवारातील जोरदार पावसाने पिकाची अशी नासाडी झाली आहे~पारडसिंगा सर्कल मधील काही भागात शेतातील शेतपिके सम्पूर्ण नष्ट झाल्याचे चित्र आहे~जातो शहरातील अण्णाभाऊ साठे नगर ,हत्तीखाना परिसरात पुराचे पाणी शिरल्याने रात्रीला नागरिकांना घरे खाली करावी लागली यात जीवनावश्यक वस्तूंच्या मोठी नासाडी झाली आहे