नागपूर : नैर्ऋत्य माेसमी पाऊस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर पाेहोचला खरा; पण, ताे तिथेच रेंगाळलेला आहे. उकाड्याने त्रस्त झालेले विदर्भातील लाेक मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा आणखी काही दिवस कायम राहणार आहे. वातावरणीय परिस्थितीनुसार २३ जूनपर्यंत माेसमी पाऊस विदर्भात प्रवेशित हाेईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘बिपाेरजाॅय’ चक्रीवादळाने मान्सूनला राेखले नाही; पण, असलेले वातावरण माेसमी पावसासाठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. २२ जूनपर्यंत पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण व गोवा उपविभागपर्यंतच कदाचित मर्यादित असू शकतो. या वातावरणातून मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर बंगाल उपसागरीय शाखेतून संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात २३ जूनपर्यंत नैर्ऋत्य मान्सून प्रवेशित होऊ शकतो, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. त्यानंतरच्या आठवड्यातही विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवसा उष्णतेची लाटसदृश्य स्थिती आहे. शनिवारी नागपुरात पारा अंशत: कमी हाेऊन ४१.२ अंशावर हाेता. ताे अद्यापही जूनच्या सरासरीपेक्षा ४.३ अंशाने अधिक आहे. चंद्रपूरला सर्वाधिक ४२.४ अंश तापमान नाेंदविले गेले. अमरावती, अकाेला, गाेंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळातही दिवसाचा पारा सरासरीच्या ५ ते ६ अंशाने जास्तच आहे. उन्हाच्या झळा, त्यामुळे हाेणाऱ्या उष्णतेने नागरिक बेहाल झाले आहेत. अशात रात्रीच्या दमट वातावरणातून अस्वस्थता आणि जीवाची घालमेल हाेत आहे. अशी अवस्था पुन्हा दाेन दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
खरिपाची पेरणी आताच नकाे
२३ जून ते ६ जुलैपर्यंतच्या पंधरवाड्यात विदर्भात जमिनीचा ओलावा वाढवेल अशा पेरणीयाेग्य माेसमी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवस उघडीपही मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७ जुलैनंतर ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले.