लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, विकास कामांमध्ये इतर रस्त्यांच्या तुलनेत पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीला आजही फारसे महत्त्व दिले जात नाही. माेवाड (ता. नरखेड) शहराला दाेन महत्त्वाच्या पांदण रस्त्यांचा वापर स्थानिक शेतकरी शेतीच्या वहिवाटीसाठी वर्षानुवर्षे करीत आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे या दाेन्ही रस्त्यांवरून चालणे कठीण जाते. शासनाकडे वारंवार मागणी करूनही या दाेन्ही पांदण रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही.
राेहिणी नक्षत्र ताेंडावर असून, समाधानकारक पाऊस काेसळताच पेरणीला सुरुवात हाेणार आहे. विशेष म्हणजे, माेवाड शहरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या दाेन्ही पांदण रस्त्यालगत आहे. या सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जे-जा करण्यासाठी तसेच बियाणे, खतांची तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी या दाेन रस्त्यांवाचून गत्यंतर नाही. पाऊस काेसळताच दाेन्ही रस्त्यांची चिखल हाेत असल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते.
या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करण्यात आली. माजी आ. डाॅ. आशीष देशमुख यांच्या काळात या दाेन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र, मागील चार वर्षात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने शेतकऱ्यांचा हिरमाेड झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने या दाेन्ही पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माेवाड येथील रवी माळोदे, नीलेश गुरू, राहुल घावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
...
गुरांना दुखापत
या पांदण रस्त्याने पावसाळ्यात काेणतीही छाेटी वाहने जात नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागताे. बैलगाडीची चाके चिखलात रुतण्यापासून तर बैलांच्या पायांना दुखापत हाेण्याच्या घटना प्रत्येक पावसाळ्यात घडतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात आर्थिक अडचणी असतात. याच काळात जनावरांना दुखापत झाल्यास त्यांच्या उपचारावर अतिरिक्त खर्चही करावा लागताे. माेवाड शहराला लागून असलेल्या वरुड (जिल्हा अमरावती) तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती केली जात असताना आमच्या रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.