नागपूर : विदर्भाने २४ तासापूर्वी अनुभवलेले पावसाळी वातावरण दाेन दिवसात पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. पश्चिमेकडे बदललेल्या वातावरणीय परिस्थितीमुळे १३ ते १५ मार्चदरम्यान विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह किरकाेळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांना पुन्हा दिलासा मिळणार आहे.
नव्याने सक्रिय झालेल्या पश्चिम झंझावातामुळे तयार झालेले कुंड उत्तर बिहारकडून छत्तीसगड, विदर्भ व तेलंगना हाेत दक्षिण कर्नाटकाच्या दिशेने घाेंगावत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मध्य प्रदेशातून जाणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेच्या संयाेगामुळे पुढचे काही दिवस वातावरण बदलणार आहे. यामुळे १३ ते १५ मार्च या तीन दिवसात विदर्भाच्या आकाशावर ढगांची गर्दी राहणार असून तुरळक ठिकाणी विजा व ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. विशेषत: १४ व १५ मार्चला पावसाळी परिस्थिती राहणार आहे. नागपूरला १६ मार्चलाही पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात पावसापेक्षा बिघडलेल्या वातावरणाचे काहूरच अधिक जाणवेल.
बदलत्या वातवारणामुळे दिवस आणि रात्रीचा पारा २ अंशाने किंवा त्याखाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा व रात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान २४ तासापूर्वी घसरलेल्या तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. नागपूरला ३५.२ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. अकाेला व अमरावतीत पारा ३७.३ आणि ३६.५ अंशावर गेला आहे. रात्रीचे तापमान मात्र सरासरीपेक्षा कमी आहे. नागपूरला १६.८ अंश किमान तापमान असून ते सरासरीपेक्षा २.१ अंश कमी आहे. गाेंदियात रात्रीचा पारा सरासरीपेक्षा २.६ अंशाने कमी आहे. इतरही जिल्ह्यात रात्री पारा अंशता कमी आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची व्यवस्था करावी,असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.