लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : तालुक्यातील भांडेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण राेजगार हमी याेजनेंतर्गत (मनरेगा) काही कामे करण्यात आली. या कामात बाेगस मजुरांच्या नावे मजुरीच्या रकमेची उचल करण्यात आली असून, हा घाेळ सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने करण्यात आला, असा आराेप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात खंडविकास अधिकारी दयाराम राठाेड यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आल्याचेही नागरिकांनी सांगितले.
सरपंच दामोधर वघारे व ग्रामसेवक राजकुमार गजभिये यांनी संगनमत करून नियमित मनरेगाचे काम पाहणाऱ्या रोजगारसेवक लक्ष्मण परतेती यांना या कामापासून दूर केले. ही जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे साेपविण्यात आली. एवढेच नव्हे तर, मनरेगाच्या कामावर असणाऱ्या मजुरांना त्यांनी केलेल्या कामाची मजुरी न देता, जे कधी कामावर गेले नाहीत, अशा मजुरांच्या नावे मजुरीच्या रकमेची उचल करण्यात आल्याचे तसेच ते मजूर सरपंच वघारे यांचे कुटुंबीय असल्याचे अनिल गोमा वाघाडे व नीतेश देवचंद कुंभरे यांनी खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, दयाराम राठाेड यांनी मनरेगाच्या कामावर असलेल्या पुष्प सुरभलाई, दीपिका गेडाम, सुनीता वाढिवे, वनिता भलावी, पाैर्णिमा वाघाडे, वर्षा वाघाडे, सविता कारसर्पे, मुक्ता राऊत, वनिता येसनसुरे, शांतकला राऊत व रमेश बावणे यांच्याशी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली. या सर्वांनी सरपंचांचे कुटुंबीय कामावर नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी नावे रेकाॅर्डवर असल्याचेही दयाराम राठाेड यांच्या निदर्शनास आले आहे. नीतेश कुंभरे यांनी त्यांची तक्रार मागे घेतली आहे.
...
हे आहेत बाेगस लाभार्थी
मनरेगाच्या कामावरील बाेगस लाभार्थ्यांमध्ये सरपंच दामाेदार वघारे यांची पत्नी, शामकला दामोधर वघारे, मुलगा दुर्गेश दामोधर वघारे, मुलगी ममता दामोधर वघारे, पुतनी सोनाली प्रभाकर वघारे, पुतन्या कोमल प्रभाकर वघारे, भाऊ शंकर सीताराम वघारे, भावाची पत्नी संगीता शंकर वघारे यांच्यासह उपसरपंच मनाेज सहारे यांची आई कचराबाई हेमराज सहारे, ग्रामपंचायत सदस्य विलास सदाशिव कुलमाटे, ग्रामपंचायत सदस्याची पत्नी शुधीमत्ता गौरीशंकर रामटेके यांचा समावेश आहे.
...
चपराशाकडे देखरेखीचे काम
लक्ष्मण परतेती यांची सन २००५ मध्ये ग्रा सभेतून सर्वांनुमते राेजगार सेवकपदी निवड केली हाेती. ते आतापर्यंत मनरेगाच्या कामावर देखरेख ठेवायचे. लग्नकार्यामुळे ते मे महिन्यात सुटीवर हाेते. सुटीनंतर ते कामावर रुजू हाेण्यास आले असता, मनरेगाच्या कामावर देखरेख ठेवायची नाही. त्या बदल्यात ग्रामपंचायतीच्या कार्यालयात साफसफाईची कामे करावीत, अशी सूचना केली हाेती. तेव्हापासून ग्रामपंचायत चपराशी या कामावर देखरेख ठेवत आहे. खंडविकास अधिकारी दयाराम राठाेड यांनी लक्ष्मण परतेती यांचाही जबाब नाेंदवून घेतला.
...
या प्रकरणाची चाैकशी सुरू आहे. यात दाेषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ज्यांना मजुरी मिळाली नाही, त्यांना मजुरीची रक्कम देेण्यात आली आहे.
- दयाराम राठाेड, खंडविकास अधिकारी,
पंचायत समिती, माैदा.
...
जे मजूर खड्ड्यांच्या खोदकामावर हाेते, त्यांच्या मजुरीचे पैसे सोमवारीच दिले आहेत. ज्यांची बीडीओंकडे तक्रार होती, त्यांनी ती मागे घेतली आहे.
- दामोधर वघारे, सरपंच,
भांडेवाडी, ता. मौदा.
...
खड्ड्यांचे खाेदकाम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या नावे मजुरी काढता येत नव्हती. त्यामुळे नाेंद असलेल्या मजुरांच्या मजुरीची उचल करून संबंधितांना मजुरी दिली.
- राजकुमार गजभिये, ग्रामसेवक,
ग्रामपंचायत, भांडेवाडी.