लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सरकारी व निमसरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस अशा अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती व कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
नगर येथील सरकारी रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालये व सरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणा चालविणाऱ्या कार्यालयातच यंत्रणा कार्यरत नाही. याबाबत सरकारही गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस, आमदार निवास यासह शहरातील २८ सरकारी इमारती व विश्रामगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली. कुठे ही यंत्रणा नाही, तर कुठे यंत्रणा आहे, पण ती कार्यरत नाही, असा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसलेल्या कार्यालयांना अग्निशमन विभागाच्या अधिनियमातील कलम ६ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा कार्यरत न केल्यास संबंधित कार्यालयांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे. परंतु, सरकारच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या नोटीसला जुमानतीलच याची शाश्वती नाही.
सरकारी विश्रामगृहातही यंत्रणा बंदच
अधिवेशन काळात महत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या विश्रामगृहातही अग्निमन यंत्रणा कार्यरत नाही. नोटीस बजावल्यानंतरही यात सुधारणा होईलच याची शाश्वती नाही. अधिवेशन आले की कार्यालये व विश्रामगृहातील यंत्रणेची तपासणी केली जाते. नोटीस बजावल्या जातात. परंतु, याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा न्यायालयातील यंत्रणाही बंद
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत अग्निशमन नियंत्रण यंत्रणाच नसल्याची धक्कादायक माहिती तपासणीत पुढे आली आहे. जीवन विमा निगम कार्यालय, सिव्हील लाईन परिसरातील प्रशासकीय इमारती, जलसंपदा विभागाचे कार्यालय अशा महत्त्वाच्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
अग्निशमन विभागाने तपासणी केलेली कार्यालये
विधानभवन व परिसरातील इमारती
राज्यपालाचे निवासस्थान असलेले राजभवन
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेले रामगिरी
उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देवगिरी
या इमारतींनाही आहे धोका
सिव्हील लाईन येथील रवी भवन व नाग भवन
हैदराबाद हाऊस
सुयोग बिल्डिंग
आमदार निवास
१६० खोल्यांचे गाळे
वनामती (रामदासपेठ)
सेमिनरी हिल्स येथील सी.पी.डब्ल्यू. विश्रामगृह
डब्ल्यूसीएल विश्रामगृह, सिव्हील लाईन
डब्ल्यूसीएल विश्रामगृह, कल्पनानगर
रेल्वे क्लब विश्रामगृह
रेल्वे सातपुडा विश्रामगृह
एम.ई.सी.एल. विश्रामगृह
एनपीटीआय विश्रामगृह
राष्ट्रीय केमिकल फर्टीलायजर विश्रामगृह
वन विभाग विश्रामगृह
ऑटोमिक एनर्जी विश्रामगृह
पॉवरग्रीड विश्रामगृह