लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : लग्नसमारंभात ५०पेक्षा अधिक नागरिकांना सहभागी हाेण्यास जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल व पाेलीस विभागाच्या संयुक्त पथकाने कामठी-नागपूर मार्गावरील न्यू येरखेडा (ता. कामठी) येथील राज लाॅयन लाॅनवर धाड टाकली. येथील लग्नसमारंभात दीड हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाल्याचे तसेच त्यांच्याकडून काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे माेठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात आल्याचे स्पष्ट हाेताच लाॅन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. २४) रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ही लाॅन सुरेंद्रसिंग गुरुदत्तसिंग (५४, रा. वैशालीनगर, नागपूर) यांच्या मालकीची असून, ती लाॅन मोहम्मद असलम मोहम्मद सिद्दिकी (५५, रा. संघर्षनगर ऑटोमोटिव्ह चौक, नागपूर) यांनी किरायाने घेतली हाेती. तिथे बुधवारी रात्री त्यांच्या दोन मुलांचा लग्नसोहळा आयाेजित केला हाेता. मोहम्मद असलम मोहम्मद सिद्दिकी यांच्या एका मुलाचा विवाह शेख निसार (५०, रा. लोधीपुरा, गणेशपेठ, नागपूर) यांच्या व दुसऱ्या मुलाचा विवाह शौकत अली (५२, रा. कोराडी, ता. कामठी) यांच्या मुलीशी संपन्न झाला.
या लग्नात केवळ ५० नागरिकांना सहभागी हाेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिली हाेती. वास्तवात, त्या लग्नामध्ये किमान दीड हजार पाहुणे सहभागी झाल्याची माहिती कामठी (नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे यांना मिळाली हाेती. त्यामुळे तहसीलदार अरविंद हिंगे व ठाणेदार संजस मेंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने लगेच त्या लाॅनवर धाड टाकली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. तिथे काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी गुन्हा दाखल करून ती लाॅन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली, अशी माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी चाैघांविरुद्ध भादंवि १८८, २६९, २७०, ३४, साथी रोग नियंत्रण अधिनियम १८९७चे कलम ३४ अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला. ही कारवाई तहसीलदार अरविंद हिंगे, ठाणेदार संजय मेंढे, दुय्यम पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, विजय भिसे, उपनिरीक्षक श्याम वारंगे, राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव, सुरेंद्र शेंडे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांच्या पथकाने कारवाई केली.
....
गुन्हा दाखल
काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लग्नसमारंभात केवळ ५० नागरिकांना सहभागी हाेण्याची परवानगी दिली आहे. मोहम्मद असलम मोहम्मद सिद्दिकी यांच्याकडील लग्नात तब्बल दीड ते दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. लग्नसमारंभात सहभागी झालेले बहुतांश पाहुणे विनामास्क हाेते, तर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते. ही बाब स्पष्ट हाेताच पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. यात लाॅन मालक सुरेंद्रसिंग गुरुदत्त सिंग, वराचे वडील मोहम्मद अस्लम मोहम्मद सिद्दिकी, वधूचे वडील शेख निसार व शौकत अली यांचा समावेश आहे.