नागपूर : काॅन्सिल फाॅर इंडियन स्कूल सर्टिफिकेट परीक्षा (आयसीएसई) बाेर्डाचा दहावी आणि बरावी परीक्षेचा निकाल साेमवारी जाहीर करण्यात आला. दहावी (आयसीएससी) च्या परीक्षेत नागपूरचा राज गणेश मिश्रा हा विद्यार्थी ९९.२० टक्के गुणांसह आणि बारावीत (आयएससी) आदित गणेश शाहू हा ९०.२५ टक्के गुणांसह विदर्भातून प्रथम आले आहेत.
नागपूर शहरात आयसीएसई बाेर्डाच्या ४ शाळा आहेत. त्यातील चंदादेवी सराफ स्कूल (सीडीएस) आणि एमएसबी इन्स्टिट्यूटमध्ये दहावी, बारावी आणि सेव्हेंथ डे स्कूल व मेरी पाॅस्पीन्स शाळेत दहावी अभ्यासक्रम आहेत. दहावीच्या परीक्षेत सीडीएस शाळेतील प्रथम आलेल्या राज मिश्रासह अनन्या सदानंद शेवरे ९७.८० टक्के गुणांसह द्वितीय आणि विभुषा जगदीश निलमेगम या विद्यार्थिनीने ९६.२० टक्के गुणांसह तृतीय स्थान प्राप्त केले आहे. याशिवाय साेहम माेहिम मेहताने ९६.२० टक्के, श्रीरंग महेश वैद्य याने ९६ टक्के आणि मनस्वी विशाल कातुरे या विद्यार्थिनीने ९५ टक्के गुणांसह गुणवत्तेत स्थान प्राप्त केले आहे. दहावीच्या परीक्षेला नागपुरातून ५५० विद्यार्थी बसले हाेते व उत्तीर्ण हाेण्याचा टक्के ९८ राहिला. सीडीएस शाळेतील ४८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्यावर स्काेअर केला आहे.
बारावीच्या परीक्षेतही सीडीएस शाळेतून आदित शाहूसह रूद्र राजेंद्र रजक याने ८२ टक्के तर मृदूल बाेदे या विद्यार्थ्याने ८१ टक्के गुणांसह तृतीय स्थान प्राप्त केले. वन्या गुप्ता या विद्यार्थिनीने ८० टक्के गुणांसह गुणवत्ता यादीत नाव नाेंदविले. एमएसबी संस्थेच्या मुदस्सर या विद्यार्थ्यानेही ८० टक्के गुण प्राप्त केले. बारावीमध्ये नागपुरातून ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ज्यात ९९ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले.