नागपूर - पक्षबांधणीसाठी बऱ्याच काळानंतर नागपूर दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरे यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेसंदर्भातील अनेक प्रश्नांना उत्तर देताना काही प्रश्नांना मात्र टोलावून लावले, अशाच एका प्रश्नाला मिश्किल भाषेत उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे, असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
वेगळा विदर्भ, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, वेदांता प्रकल्प अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देणाऱ्या राज ठाकरेंना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला अजेंडा घेऊन मैदानात उतरणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी याविषयी माझं बायडनशी बोलणं सुरू आहे, असं मिश्किल उत्तर दिलं.
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी नागपुरातील आपल्या पक्षसंघटनेबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी नागपूरमधील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे सांगितले. तसेच नवी कार्यकारिणी घटस्थापनेला जाहीर करेन, अशी घोषणाही केली. तसेच विदर्भातील पक्षसंघटनेकडे माझ्याकडून दुर्लक्ष झाले. यापुढे ती चूक होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.