नागपूर : पक्षबांधणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा २३ डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अधिवेशन काळात आयोजित या दौऱ्यात ते शाखा अध्यक्षांना स्वत: नियुक्तिपत्र प्रदान करणार आहेत.
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. ऑक्टोबरमध्ये केलेल्या नागपूर दौऱ्यात त्यांनी पक्षबांधणीवर नाराजी व्यक्त करीत कार्यकारिणी बरखास्त केली होती. यानंतर महिन्याभरात नवी कार्यकारिणी नेमण्यात आली. आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नागपूरवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नागपूर शहरातील सर्व शाखांची नव्याने बांधणी करण्यात आली असून नवनियुक्त शाखा अध्यक्षांना राज ठाकरे हे स्वत: नियुक्तिपत्र देणार आहेत. याच दिवशी ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून निवडणुकीसाठी अत्यावश्यक सूचना देणार आहेत. मनसेने गेल्या काळात केलेल्या विविध आंदोलनांची माहिती असलेली एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे प्रकाशन राज यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.