नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष संघटना बळकटीसाठी त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. काल रविवारी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत म्युझिकल फांऊटन शो ला उपस्थिती दर्शविली. तर, आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यानंतर आज दुपारी १२ वाजता ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.
आज राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काल त्यांनी नागपुरातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेऊन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जे काही शिल्लक दिवस आहेत, त्या दिवसांत प्रचंड काम करून जनतेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या. यानंतर, संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींसमवेत ते म्युझिकल फाऊंटनच्या ट्रायल शोमध्ये सहभागी झाले व लेझर शोची पाहणी केल्यानंतर गडकरींची स्तुतीही केली. यानंतर आज सकाळी ठाकरे हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची स्तुती करत ते दिलदार मित्र आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. या भेटीनंतर आज दुपारी १२ वाजता ठाकरे रवि भवन येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. पण आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. असे असले तरी भाजप-मनसे आणि शिंदे गटाची जवळीक मनसेला फायदेशीर ठरू शकते.
रवि भवन परिसरातील स्वागताचे बॅनर हटविले
दरम्यान, काल राज ठाकरेंच्या स्वागतासाठी रविभवन परिसरात लावण्यात आलेले पोस्टर रात्रभरात काढण्यात आले आहेत. यावरून कार्यकरत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सदर बॅनर पुन्हा लावण्यास सुरुवात केली आहेत. रविभवन परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले असून त्यांनी बॅनर काढण्यावरून आपला विरोध दर्शविला आहे.
रविभवनात अनेकांचा हिरमोड
काल राज ठाकरे यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी रविभवनात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यात महिला व युवकदेखील होते. मात्र, राज ठाकरे यांना भेटण्यासाठी अनेकांना संधीच मिळाली नाही. रविभवनातील बैठक सभागृहातदेखील मोजक्याच पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. आज दुपारी १२ वाजता राज ठाकरे यांची रवि भवन येथे पत्रकार परिषद असून या भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर रात्री काढण्यात आले होते ते कार्यकर्त्यांकडून पुन्हा लावण्यात येत आहे.