नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याच्या घोषणेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री नागपुरात पोहोचले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास करत आहेत. त्यांचे नेतृत्व पाहून राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर यावेळी मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले. उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा त्याग केला आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ते आता बसले आहेत. सत्तेसाठी धनुष्यबाण गहाण ठेवले होते. उद्धव यांचा पक्ष काँग्रेसभिमुख आहे. त्यांना पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. कोविड संसर्गाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला मदत करत होते. तर उद्धव ठाकरे घरीच बसले होता. असे करून ते कोणते शौर्य दाखवत होते असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.