नागपूर : कच्चे कैदी पलायनाची कसून चौकशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुरू असल्याने शनिवारी मोक्काचा आरोपी खतरनाक गुन्हेगार राजा गौस याची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पेशी होऊन त्याला पुढची तारीख २९ एप्रिल देण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशीची कार्यवाही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) चे विशेष न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयात पार पडली. न्यायालयात आरोपीचे वकील अॅड. आर. के. तिवारी उपस्थित होते. राजा गौसला कारागृहातून न्यायालयात आणण्यात येणार असल्याने सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी खुद्द सहपोलीस आयुक्त अनुपकुमार, परिमंडळ २ चे उपायुक्त संजय लाटकर हे सकाळी १० वाजताच न्यायालय आवारात दाखल झाले होते. जिल्हा न्यायालयाच्या दोन्ही गेटवर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. न्यायालयात येणाऱ्यांची कसून झडती आणि विचारपूस केली जात होती. त्यानंतरच त्यांना आत सोडले जात होते. कारागृहात कैद्यांची कसून चौकशी सुरू असल्याने राजा गौसची प्रत्यक्ष न्यायालयीन पेशी शक्य नाही, असे न्यायालयाला कारागृह प्रशासनाकडून कळवण्यात आले. गौसची थेट पेशी होणार नसल्याच्या माहितीने दुपारी १२ वाजता अतिरिक्त बंदोबस्त काढून टाकण्यात आला. गौसची कारागृहात बसून पेशी झाली. मंगळवारच्या पहाटे राजाच्या टोळीतील सदस्य मोक्काचे आरोपी सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, बिशेनसिंग ऊर्फ फारूख ऊर्फ मुश्ताक उईके, सोएब खान ऊर्फ शिबू दानिश वलीमखान आणि इतर गुन्ह्यातील दोन आरोपी कारागृहातून पळून गेले. ११ जानेवारी २०१३ रोजी गोळीबार करून नंदनवन भागातील हिवरीनगर येथील महालक्ष्मंी ज्वेलर्स लुटल्याच्या घटनेनंतर राजा गौस आणि पलायन केलेल्या या आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. न्यायालयात खटला सुरू होण्याच्या स्थितीत असतानाच हे तीन महत्त्वाचे आरोपी पळून गेले. (प्रतिनिधी)
राजा गौसची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने पेशी
By admin | Published: April 05, 2015 2:23 AM