नोकरीचे आमिष दाखवून अपहरण : दीड लाखात विक्री नागपूर : तरुणीला चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर तीन आरोपींनी तिची राजस्थानात विक्री केली. कळमन्यात तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती आता उघड झाली असून, पोलिसांनी राजू यादव, सेनकी जनबंधू तसेच प्रिया ऊर्फ पूजा (रा. नेताजीनगर) या तिघांवर गुन्हे दाखल केले. पीडित तरुणी २० वर्षांची आहे. गरीब कुटुंबातील या तरुणीशी आरोपी प्रियाने ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तिला पैशाची चणचण असल्याचे माहीत होताच एक दोनदा आर्थिक मदतही केली. त्यानंतर तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून राजू यादव तसेच सेनकी जनबंधूची ओळख करून दिली. २३ मे च्या सकाळी नोकरीला चल म्हणत या तिघांनी पीडित तरुणीला कोटा (राजस्थान) येथे नेले. तेथे तरुणीचा एका व्यक्तीला १ लाख, ४० हजारात सौदा करून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यानंतर तिला मारहाण करीत तेथेच सोडून आरोपी पळून आले. तब्बल तीन महिने नरकयातना सहन केल्यानंतर तरुणीने संधी साधून नागपुरात संपर्क साधला. त्यानंतर आरोपींचे बिंग फुटले. पीडित तरुणीची सुटका झाल्यानंतर तिने कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)तिचे बनावट आधार कार्डआरोपींची सराईत टोळी असून, त्यांनी अशा प्रकारे अनेक महिला-मुलींचे जीवन उद्ध्वस्त केल्याची चर्चा आहे. या टोळीतील सदस्य पीडित महिला, मुलींचे अपहरण करून विक्री करण्यासोबतच त्यांचे बनावट आधार कार्ड, लिव्हींग सर्टिफिकेटही बनवितात. पीडित तरुणीसोबतही आरोपींनी असाच प्रकार केला होता.
राजस्थानमध्ये तरुणीला विकले
By admin | Published: September 10, 2016 2:15 AM