लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा येथील तिरंगा चौकानजीक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचे समाधीस्थळ जीर्णावस्थेत आहे. समाधीस्थळ परिसरात सर्वत्र झुडपे वाढलेली आहेत. येथे साफसफाई होत नाही. या परिसराच्या विकासाचा प्रस्ताव प्रभागाच्या नगरसेविका दिव्या धुरडे यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. मात्र मनपाच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
समाधीस्थळ परिसरात अतिक्रमण होत असल्याने परिसराला संरक्षण भिंत, समाधीची डागडुजी, प्रवेश गेट, ई-म्युझियम व परिसरातील विकास कामे यासाठी १ कोटी ६८ कोटींचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. हा निधी मिळावा, अशी मागणी धुरडे यांनी केली आहे.
महापौरांनी केली पाहणी
महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी समाधीस्थळ परिसराची पाहणी केली. यावेळी बख्त बुलंद शाह यांचे वंशज वीरेंद्र शाहू, राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्या माया इवनाते, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे आदी उपस्थित होते. समाधीस्थळाची डागडुजी आणि त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात हेरिटेज समितीकडे प्रस्ताव पाठवून समितीच्या निर्धारित वास्तू शिल्पकाराकडून प्रस्ताव तयार करून अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दयाशंकर तिवारी यांनी दिले.