नागपूर : शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत विविध भ्रष्टाचाराचे आरोप लावणारे भाजपच्या ग्राम विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दोन युवकांनी रात्रीच्या अंधारात आपल्याला धमकी दिली असून, आ. जयस्वाल यांच्या इशाऱ्यावर आपल्याला धमकविण्यात येत आहे, अशी तक्रार ठाकरे यांनी सोमवारी रामटेक पोलिसांत दाखल केली आहे.
ठाकरे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे की, आ. आशिष जयस्वाल हे जनतेची कामे करीत नाही. त्यांनी निष्क्रियता आपण गेल्या काही दिवसांपासून जनतेसमोर मांडत आहोत. जयस्वाल यांनी आमदारकीचा व खनिकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून कोट्यवधीचे घोटाळे केले आहेत. ९ जुलैला आपण नागपूर प्रेस क्लबमध्ये याबाबत पत्रकार परिषद घेत जयस्वाल यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता.
यानंतर दुसऱ्याच दिवशी १० जुलैला रात्री नऊच्या सुमारास मी खळतकर सभागृहाच्या समोरील राष्ट्रीय महामार्गावर उभा असताना दोन युवक अंधाराचा फायदा घेत माझ्याजवळ आले. ‘आप जयस्वाल साहब के बारेमे बोलना बंद करो, वरना आपको महंगा पडेगा. रस्ते पर कब कहा उडा देंगे पता भी नही चलेगा’, अशी धमकी देऊन निघून गेले. आ. जयस्वाल यांच्या इशाऱ्यावरच त्या युवकांनी आपल्याला धमकावले, असा दावाही ठाकरे यांनी पोलीस तक्रारीत केला आहे. आपल्या जिवाला धोका असून, याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे.