नागपूर : गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू करण्याच्या तयारीला वेग आला आहे. सध्या गाेरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रात असलेल्या प्राण्यांना या प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्याची तयारी चाललेली आहे. शुक्रवारी बचाव केंद्रात असलेल्या राजकुमार या वाघाला प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यात आले.
गाेरेवाडा बचाव केंद्रातील प्राणी आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्लीकडून परवानगी प्राप्त झाली आहे. शुक्रवारपासून स्थलांतरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रेस्क्यू सेंटरमध्ये असलेल्या राजकुमार या वाघाला पहिल्या दिवशी स्थलांतरित करण्यात आले. राजकुमारचे वय अंदाजे ५ वर्षे ६ महिने आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील तुमसर परिसरात लग्न समारंभात हा वाघ शिरला हाेता. वनविभागातर्फे त्याला पकडून गाेरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले हाेते. केंद्रीय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेऊन त्याला प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यात आले. गाेरेवाडा प्रकल्पाच्या वन्यप्राणी संशाेधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डाॅ. शिरीष उपाध्ये, गाेरेवाडा प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रमाेद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात वन्यप्राणी संशाेधन केंद्राचे उपसंचालक डाॅ. व्ही. एम. धुत, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शालिनी ए. एस., डाॅ मयूर पावशे, डाॅ. सुजित काेलंगथ, सहायक वनसंरक्षक विजय सूर्यवंशी, एच. व्ही. माडभुषी, वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. भाेगे या कार्यवाहीत सहभागी हाेते.
६ बिबट व ७ अस्वलही हाेणार स्थलांतरित
पी. बी. पंचभाई यांनी सांगितले, शुक्रवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यानंतर रेस्क्यू सेंटरमधील एक वाघीण तसेच २ नर व ५ मादींसह ७ बिबट आणि ६ अस्वलही स्थलांतरित करण्यात येणार आहेत. इतरही प्राणी स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच सुरू हाेणार प्राणिसंग्रहालय
सूत्राच्या माहितीनुसार, प्राणिसंग्रहालय सुरू करण्याच्या तयारीला वेग आला आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीपर्यंत गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू हाेणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.