बाबासाहेबांच्या पुतण्याचे नातू : भदंत सुरेई ससाई यांनी दिले चीवर दान नागपूर : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी राजरत्न अशोक आंबेडकर यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर यांचे ते नातू आहेत. बुधवारी इंदोरा येथील बुद्ध विहारात आयोजित छोटेखानी समारंभात भदंत ससाई यांनी त्यांना चीवर दान दिले. तसेच धम्म आंबेडकर असे त्यांचे नामकरण केले. यापुढे ते धम्म या नावानेच ओळखले जातील. श्रामणेर दीक्षा ग्रहण केल्यानंतर राजरत्न आंबेडकर यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजरत्न आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रभारी आहेत. त्यांचे वडील अशोक आंबेडकर हे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन आहेत. राजरत्न हे स्वत: मुंबईतील डॉ. आंबेडकर महाविद्यलयात अधिव्याख्याता असून पीएचडी करीत आहेत. यापुढे आपण संपूर्ण आयुष्य हे बौद्ध धम्माच्या कार्यात घालवणार आहोत. भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. केवळ स्वप्नच पाहिले नसून त्यादिशेने जाण्यासाठी त्यांनी १० सूत्री कार्यक्रम सुद्धा आखून दिला होता. त्यापैकी ८ वा कार्यक्रम हा देशात प्रशिक्षित युवा बौद्ध भंते तयार करण्याचा होता. त्यादिशेने आपण स्वत:पासून सुरुवात केली आहे. येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचे ५ लाख नवीन सदस्य तयार करण्याचा संकल्प आपण केला असून त्यासाठी देशभरात फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)या दिवसाचे विशेष महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेमुळे जो अपमान सहन करावा लागला, तो संपूर्ण जगालाच माहीत आहे. परंतु गुजरातमध्ये झालेल्या अपमानानंतर त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. तो दिवस २३ सप्टेंबर हा असून तो संकल्प दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे आजच्याच दिवशी श्रामणेर दीक्षा ग्रहण करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
राजरत्न आंबेडकर यांनी घेतली श्रामणेर दीक्षा
By admin | Published: September 24, 2015 3:33 AM