नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बुधवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. भारत तिबेटी सहयोगी मूव्हमेंटशी जुळलेल्या तसेच तिबेटी निर्वासित महिलांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच माजी सरकार्यवाह व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांना राखी बांधली. महाल येथील संघ मुख्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. अर्जुनी मोरगावजवळील गोठणगाव येथील शिबीरात वास्तव्यास असलेल्या तिबेटी भगिनी यावेळी उपस्थित होत्या. तिबेटियन वुमेन्स असोसिएशनच्या अध्यक्ष कुनसॅंग डेचेन, सोनम त्सोमो, कार्मा डोल्कर, धोंडुप सांग्पो, भारत तिबेट समन्वय मंचाच्या लिपाक्षी माने व प्रा.विजय केवलरामानी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
चीनने तिबेटमधील लोकांना विस्थापित केले आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातदेखील चीनकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील भगिनींनी सरसंघचालकांना राखी बांधून पाठीशी उभे राहण्याची विनंती केली. संघ आणि भारत तिबेटी बांधवासोबत असल्याचे आश्वासन यावेळी डॉ.मोहन भागवत यांनी दिले.