कामठी तालुक्यात निवडणूक होऊ घातलेल्या ९ ग्रा.पं. क्षेत्रात विविध राजकीय गटांच्या पॅनेलनी रॅली आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधले. तालुक्यात बहुतांश ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा समर्थित पॅनेल असाच सामना होताना दिसत आहे. दोन ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आली. पण ती काही वॉर्डापुरती मर्यादित आहे. तालुक्यातील कोराडी, लोनखैरी ,घोरपड, पवनगाव, महालगाव, खेडी, टेमसना, भामेवाडा व केसोरी या ९ ग्रा.पं.साठी निवडणूक होत आहे. टेमसना ग्रामपंचायत क्षेत्रात माजी शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे यांनी काँग्रेस समर्थित ग्राम विकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांकरिता पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले.
महालगावात वॉर्ड ३ ची निवडणूक रद्द
महालगाव ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रमांक ३ येथील सर्वसाधारण जागेकरिता निवडणूक रिगणातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रवीण भगवान धांडे यांनी ९ जानेवारीला दुपारी ४ वाजता सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने या जागेची निवडणूक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार व राज्य निवडणूक आयोगाच्या ८ जानेवारी २०२० च्या परिपत्रकानुसार निवडणूक अधिकारी व तहसीलदार अरविंद हिंगे यांनी रद्द केली आहे.