लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत सरकारने लोकसभा व राज्यभेतून पारित केलेल्या नागरिकता संशोधन विधेयक (सीएए)च्या समर्थनार्थ लोकाधिकार मंचच्यावतीने रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंचचे संयोजक गोविंद शेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. ही रॅली यशवंत स्टेडियम येथून निघेल. त्यानंतर झाशी राणी चौक येथे झाशीच्या राणीच्या पुतळ्याला व व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. तद्नंतर संविधान चौक येथे रॅली पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर तेथेच जाहीर सभा पार पडेल. या जाहीर सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असल्याचेही ते म्हणाले. या रॅलीमध्ये २० हजाराच्या वर नागरिक सहभागी होण्याची शक्यता शेंडे यांनी यावेळी वर्तवली. याप्रसंगी माजी खा. अजय संचेती, खा. विकास महात्मे, सुधाकर कोहळे, सुधाकरराव देशमुख, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकता संशोधन विधेयक समर्थनार्थ आज रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:39 AM