लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे काव्य लिहिणारे गोविंदाग्रज आणि विनोदी लेखनातून हास्यांचा पेटारा खोलणारे बाळकराम यांची २३ जानेवारी २०२१ रोजी १०२ वी पुण्यतिथी आहे. मात्र, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाची वाणवाच दिसून येते. कारणे कोरोनाची सांगितली जातील आणि झालेल्या विस्मरणावर पांघरुण टाकले जाईल, हे वास्तव आहे.
मृत्यूसवे ओसणारा काळ व्यक्तीचे स्मरण पुसट करत जातो. व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या कृती अन् साहित्य इतिहासात कोरल्या जातात. काही दिवस त्या उल्लेखनीय कार्याचा गलबला केला जातो आणि नंतर तोही शांत होतो. याचा प्रत्यय प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या रूपाने दिसून येतो. उणे-पुरे १७-१८ दिवसांचा सहवास नागपूर-सावनेरच्या वाट्याला त्यांचा आला. लाभलेला हा सहवास त्यांच्या अखेरच्या श्वासाचा होता. त्याचमुळे सावनेरशी त्यांचे नाव जोडले गेले आणि जागतिक नाट्यविश्वात सावनेर अमर झाले. असे असले तरी त्यांचे वास्तव्य झालेल्या त्या घराशिवाय, बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाशिवाय आणि एका पुतळ्याशिवाय दुसरे काहीच नाही. घराला घरपण कुटुंबातील सदस्यांमुळे असते. अगदी तसेच मोठ्या नावाचे जागरण त्यांच्या कलाकृतींच्या अस्तित्वामुळे असते.
दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे नागपूर व सावनेर येथील काही गडकरीप्रेमी लोकांनी गडकरी यांच्या स्मारकरूपी घराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली होती. शिवाय, घरात टांगण्यात आलेल्या गडकऱ्यांच्या फोटोंना संदर्भ कथा जोडण्यासोबतच घराच्या मागील वऱ्हांड्यात छोटे ऑडिटोरियम साकारण्याचा विचार होता. मात्र, बोलणी आणि करणी यात जे अंतर दिसून येते, ते येथेही दिसून आले. हळूहळू तो मुद्दाच मागे सरला. नाट्यपरिषदेकडूनही नाट्यउपक्रम वगळता केवळ फोटोला हार घालून बोलघेवड्या वचनांची बरसातच केली जाते.
त्यामुळे पुढच्या पिढीपुढे राम गणेश गडकरी म्हणजे कोण, असाच प्रश्न पडणार हे निश्चित. नाट्यपरिषदेचा महोत्सव आजवर न झाला - तीन वर्षापूर्वी राम गणेश गडकरी यांच्या पुण्यस्मरण शताब्दी वर्षानिमित्त रा.ग. महोत्सव घेण्याची घोषणा नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेतर्फे करण्यात आली होती. मात्र, घोषणेचा विसर पडला आणि ना शताब्दी साजरी झाली ना तो महोत्सव. आजही अनेक रंगकर्मी या महोत्सवाची वाट बघत आहेत, हे विशेष.