नागपूर : दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेले राम खांडेकर अनंतात विलीन झाले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. दीर्घ आजारामुळे त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले होते. दरम्यान राम खांडेकर यांच्या निधनाबद्दल राज्यातील नेत्यांनी शोक प्रकट केला आहे.
मोठ्या निर्णय प्रक्रियांचा साक्षीदार हरवला
राम खांडेकर यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कार्यालयात प्रदीर्घ काळ प्रशासकीय जबाबदारी सांभाळली होती. भाषा विषयाचे अभ्यासक असलेले खांडेकर साहित्यिकदेखील होते. देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक निर्णयप्रक्रियांचा साक्षीदार हरवला.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व हरविले
राम खांडेकर हे विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते. उच्च पदावर काम करीत असताना अत्यंत साधेपणा, नम्रता आणि शालिनता कधीही सोडली नाही. त्यांच्या निधनामुळे मोठ्या कालखंडाचा साक्षीदार गेला.
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री
कुशल व प्रामाणिक प्रशासक गमविला
राम खांडेकर यांच्या निधनाने एक कुशल व प्रामाणिक प्रशासक गमावला आहे. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात राहून त्यांनी जीवनमूल्य अखेरपर्यंत जपली.अनेक संवेदनशील विषयांवर त्यांनी दिलेले सल्ले हे दूरगामी राहिले.
- नितीन राऊत, ऊर्जामंत्री व पालकमंत्री (नागपूर जिल्हा)
नि:स्पृह व्यक्तिमत्त्व हरपले
राम खांडेकर यांच्या निधनाने कर्तव्यदक्ष आणि नि:स्पृह अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केवळ चिकाटी, सातत्य आणि कर्तव्यदक्षतेतूनच एका मोठा प्रवास त्यांनी साध्य केला.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा