- योगेश पांडे नागपूर - अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत. समाजाला सर्व कलह, वाद दूर सारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी सामंजस्याने मार्गक्रमण करावे लागेल. हेच नागरिकांचे तप ठरेल, अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.
आजचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी पंतप्रधानांनी कठोर व्रत केले. मात्र केवळ त्यांनी व्रत करून होणार आहे का? सर्वांचीदेखील देशाप्रति जबाबदारी आहे. अयोध्येत कुठलाही कलह व द्वेष नाही अशी नगरी आहे. मात्र तो कलह झाला म्हणून राम वनवासात गेले होते. आता पाचशे वर्षांनंतर ते परत अयोध्येत आले आहेत. त्यांचे तपस्या, परिश्रमाला नमन आहेच. जो आजच्या सोहळ्याचा इतिहास ऐकेल त्याला राष्ट्रासाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळेल. मात्र या सोहळ्यातून आपल्यासाठी कर्तव्याचा आदेशदेखील आहे. रामराज्यात सामान्य नागरिकांसाठी विशेष वर्णन आहे. आपल्यालादेखील सर्व कलह, वाद दूर करावे लागतील. लहान वादांतून भांडण करण्याची सवय सोडावी लागेल. सामान्य नागरिक प्रामाणिकपणे वागणारे हवेत. सत्य, करुणा, शुचिता, तप यांचे युगानुकूल आचरण असले पाहिजे. जनतेला एकमेकांसोबत समन्वय साधून मार्गक्रमण करावे लागेल. हेच सत्याचे आचरण ठरेल. सेवा व परोपकार हे करुणेचे आचरण आहे. सरकारच्या गरिबांसाठी अनेक योजना आहेत. मात्र जेथे वंचित दिसतील तेथे मदतीसाठी धाव घेतली पाहिजे. जास्तीत जास्त दान केले पाहिजे. शुचितेसाठी संयम बाळगला पाहिजे. इतरांच्या मतांचा आदर केला पाहिजे. अशी शुचिता बाळगणे गरजेचे आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
समाज, कुटुंबात वावरताना शिस्त बाळगामहात्मा गांधी म्हणायचे की प्रत्येकाची गरज भागविण्याची क्षमता पृथ्वीत आहे, मात्र सर्वांच्या मनातील लोभ मात्र ती पूर्ण करू शकत नाही. लोकांनी आपले जीवन, कुटुंब, समाजात शिस्तीने वागायला हवे. नागरिकांनी दुसऱ्यांप्रति संवेदना बाळगणे व शिस्तीने वागणे हीच देशभक्ती आहे. पंतप्रधानांसारखे देशासाठी सर्वांनीच तप केले पाहिजे. तरच देश विश्वगुरू बनेल. त्यांचे व या भूमीसाठी बलिदान करणाऱ्यांचे व्रत आपल्याला समोर घेऊन जायचे आहे. कर्तव्याची आठवण देऊन कृतीप्रवण करण्यासाठी रामलल्ला आले आहेत. मंदिर निर्माण पूर्ण होईपर्यंत विश्वगुरू भारताचे निर्माण शक्य होईल अशी क्षमता आपल्या देशात आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.