नागपूर : अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीत रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणानिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद सोमवारी तयार करण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग नोंदवून उपक्रमाला सुरूवात केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने शेफ विष्णू मनोहर यांचेद्वारे एकूण सात हजार किलो सामग्रीतून मोठ्या कढईत प्रसाद तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसाद बनविण्याचे सर्व विक्रम मोडित निघतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रसाद तयार करण्यासाठी हनुमान कढई तयार करण्यात आली असून ही कढई अयोध्येला देखील जाणार असून तेथे देखील सर्वाधिक प्रसाद तयार करण्याचा नवीन विक्रम नागपूरच्या नावे प्रस्थापीत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.तत्पुर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोराडी मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीची आरती करून दर्शन घेतले. मंदिराचे विश्वस्त समितीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.