नागपूर : प्रभू श्री रामाचा जन्मोत्सव आज, गुरुवारी उपराजधानीत धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. तीन वर्षांनंतर मंदिरात मोठ्या प्रकारे आयोजन करण्यात आल्यामुळे उपराजधानीतील भाविकांमध्ये रामनवमीनिमित्त उत्साह संचारला आहे, तर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि पश्चिम नागपुरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात ३० मार्चला पहाटे चार वाजता भगवान श्रीरामचंद्रांचा उत्थान, मंगल आरती, अभिषेक, अभ्यंगस्नान, सकाळी पाच वाजता शहनाई वादन, सकाळी ९ ते १० पर्यंत श्रीरामकृष्ण मठ संकीर्तन मंडळातर्फे श्रीराम संकीर्तन करण्यात आले तर सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत ओम हरे-हरे कृष्ण मानस आणि संकीर्तन मंडळातर्फे भजनाद्वारे महामंत्राचे संकीर्तन येत आहे. शोभायात्रा दुपारी चार वाजता मंदिरातून निघणार आहे.
श्री राम जन्मोत्सव समिती
श्री राम जन्मोत्सव समिती चंद्रनगर पारडीतर्फे राम जन्मोत्सवानिमित्त २७ मार्चपासून चार दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३० मार्चला रामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्रांची आरती-पूजन आणि भव्य महाप्रसाद होणार आहे.
विश्व हिंदू परिषद
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रामनवमीनिमित्त महाष्टमीला रुईकर रोड महालमध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी विहिपचे महासचिव मिलिंद परांडे यांनी अयोध्येत सर्व हिंदू समुदायांच्या प्रयत्नांमुळे राम मंदिर शक्य झाल्याचे सांगितले. यावेळी आमदार प्रवीण दटके, श्रीपाद रिसालदार, प्रशांत तित्रे, विशाल पुंज, निरंजन रिसालदार, श्रीकांत आगलावे, अमोल ठाकरे, सुबोध आचार्य, श्रद्धा पाठक, राम पलांदुरकर, दिलीप दिवे, लखन कुरील, ऋषभ अरखेल, रोशनी ठाकूर, सुधीर अभ्यंकर, सौरभ महाकाळकर, संकेत अंबेकर, सुशील चौरसिया, सचिन कावळे, कौशल जोशी, वृंदा रिसालदार, मंजिरी वाघमारे, मंगला राऊत, शिल्पा पोहाने, गौरी सावतकर उपस्थित होत्या.
पश्चिम नागपुरातून आज निघणार शोभायात्रा
पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने रामनवमीनिमित्त ३० मार्चला सायंकाळी ५.३० वाजता रामनगरच्या श्रीराम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा आणि श्रीरामाच्या पादुकांचे पूजन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते होईल. शोभायात्रेत ३१ आकर्षक देखाव्यांचा समावेश राहणार आहे. विविध संस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या वर्षी शाोभायात्रेत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विश्वगुरू भारत यावर आधारित भारतमातेचा चित्ररथ, प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळविल्यानंतर पुष्पक विमानाने अयोध्येत आगमन याशिवाय विविध देवी-देवता आणि विदर्भाच्या आदासा मंदिरातील गणपती, कोराडीतील माँ जगदंबा माता, धापेवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी, शेगावचे गजानन महाराज यांसारखे विविध देखावे विशेष आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.
भोसले राजघराण्याची ऐतिहासिक शोभायात्रा
रामनवमीनिमित्त भोसले राजघराण्याची ३०० वर्ष जुनी ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. गुडीपाडव्यापासून रामजन्म म्हणजे नऊ दिव-नवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. भगवान श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत श्री हनुमान, प्रभू श्री रामचंद्र यांची पालखी आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. शोभायात्रा दुपारी चार वाजता सिनिअर भोसला पॅलेस महाल येथून निघून कोतवाली चौक, बडकस चौक, चितारओळी, गांधी पुतळा, बडकस चौक, कोतवाली चौक या मार्गाने सिनिअर भोसला पॅलेस येथे पोहोचेल.
पद्मशाली श्रीराम नवमी जन्मोत्सव संस्था
श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेत पद्मशाली श्रीराम नवमी जन्मोत्सव संस्थेच्या समाज बांधवांतर्फे सहकार्य करण्यात येणार आहे.