लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुतळे, स्मारके, रस्त्यांना दिलेली महापुरुषांची नावे ही आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. आपल्या महापुरुषांच्या विचाराशी बांधिलकी सांगण्यासाठी पुतळ्यांची गरज आहे. आधुनिक जगतात वावरणाऱ्या युवा पिढीसाठी ही प्रेरणास्थाने आहेत, असे मत प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित राम सुतार यांनी व्यक्त केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे आयोजित लॅण्डस्केप पेंटिंग प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते आले असता लोकमतशी बोलत होते. यावेळी त्यांचे पुत्र अनिल सुतार सुद्धा उपस्थित होते.गुजरातच्या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा साकारण्यात मोलाचे योगदान दिलेले राम सुतार यांच्या हातातून महापुरुषांचे अनेक शिल्प घडले आहे. त्यांचे शिल्प देशातच नाही तर विदेशातही बघायला मिळत आहे. बहुतांश शिल्पकार दगडातून देवाची रुपे साकारतात. पण राम सुतार यांना देवाने असा हुनर दिला आहे, की जे दगडातून मानव साकारतात. त्यामुळे आजवर त्यांच्या हातून ३५० च्यावर महात्मा गांधींचे पुतळे साकार झाले आहे. भारतातील मोठमोठे पुतळे साकारण्यात राम सुतार हे एकमेव ख्यातीप्राप्त नाव आहे. शिल्पकारांना दगडातून देव घडविणे जेवढे सोपी आहे, तेवढेच कठीण दगडातून मानव घडविणे आहे. कारण मानवाची प्रतिकृती साकारताना त्याचे व्यक्तिमत्त्वाचा, चेहऱ्यावरील हावभाव, त्यातील बारकावे या सर्वांचाच अभ्यास करावा लागतो. देव मात्र शिल्पकार घडवेल तसा घडतो. आपल्या नव्या प्रोजेक्टसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, अयोध्येच्या शरयू नदीच्या किनाऱ्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी २५१ मीटरची प्रभू श्री रामाची मूर्ती साकारण्यात येत आहे. त्यासाठी सुतार यांनी उत्तर प्रदेश सरकारला डिझाईन दिले आहे. यूपी सरकारने त्याला मान्यताही दिली आहे. १५० फुटाच्या पायावर उभारण्यात येणाऱ्या मूर्तीची उंची ५२२ फुट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार अरबी समुद्रात ४०० फुट उंच घोड्यावर सवार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची भव्यदिव्य मूर्ती साकारणार आहे. याची जबाबदारीसुद्धा सुतार यांना दिली आहे. त्याचबरोबर इंदू मिलच्या जागेवर ते ३०० फुटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती साकारणार आहे.स्टॅच्यु ऑफ युनिटीचे आकर्षणगुजरातच्या नर्मदा नदीवर साकारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे हे स्थळ पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठरत आहे. दररोज या स्थळाला २० हजारावर पर्यटक भेटी देत आहे. सरकार दररोज दोन कोटींचे उत्पन्न कमवित आहे. त्यामुळे येथील स्थानिक लोकांच्या उत्पन्नात भर पडली आहे. येथे असलेल्या संग्रहालयातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची युवा पिढीला अनुभूती होते.प्रशासनाबरोबर नागरिकांनी घ्यावी काळजीसुतार म्हणाले की, महापुरुषांचे पुतळे उभारणे म्हणजे त्यांचे विचार जपणे होय. त्यामुळे पुतळ्यांची काळजी घेणे हे प्रशासनाबरोबरच जनतेचेही कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही. जयंती पुण्यतिथीलाच पुतळ्यांची स्वच्छता होते. जनतेकडूनही त्यांची उपेक्षा होते. त्यामुळे पुतळ्यांच्या बाबतीत प्रशासनाबरोबरच जनतेमध्येही आपुलकीची भावना निर्माण होणे गरजेचे आहे.मूर्तिकलेसाठी धैर्य गरजेचेसुतार म्हणाले की, युवा शिल्पकारांना सर्वच काही झटपट हवे आहे. एकच काम बराच काळ करीत राहण्यात त्यांची रुची नाही. मूर्तिकला हे मेहनतीसोबतच धैर्याचे काम आहे. मूर्ती साकारताना ८ ते १० महिन्याचा कालावधी लागतो. ही कला एक हार्डवर्क आहे, तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा शिल्पकारांनी धैर्य ठेवून आपल्या कलेची प्रतिभा लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.सरकार बदलले की पुतळे बदलतातकाँग्रेस सरकारच्या काळात महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. भाजपा सरकारच्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे पुतळ्याची निर्मिती जास्त होत आहे. उत्तर प्रदेशात मायावतीचे सरकार असताना मायावतीचे पुतळे साकारले होते. त्यामुळे सरकारे बदलली की पुतळेही बदलत असतात.
सुप्रसिद्ध मूर्तिकार सुतार अयोध्येत साकारणार ‘राम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 8:42 PM
पुतळे, स्मारके, रस्त्यांना दिलेली महापुरुषांची नावे ही आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. आपल्या महापुरुषांच्या विचाराशी बांधिलकी सांगण्यासाठी पुतळ्यांची गरज आहे. आधुनिक जगतात वावरणाऱ्या युवा पिढीसाठी ही प्रेरणास्थाने आहेत, असे मत प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित राम सुतार यांनी व्यक्त केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे आयोजित लॅण्डस्केप पेंटिंग प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते आले असता लोकमतशी बोलत होते.
ठळक मुद्देमहापुरुषांचे पुतळे युवा पिढीसाठी प्रेरणादायीराम सुतार यांची लोकमतला खास मुलाखत